कविता – केवढे हे क्रौर्य!

 

कवी न. वा. टिळक यांनी लिहिलेली, एक अतिशय सुंदर कविता. पूर्वीच्या पाठ्यपुस्तकात होती. गप्पांच्या ओघात अचानक आली आणि मायाजालावर थोडेसे धुंडाळल्यानंतर गवसली.

या कवितेतून कवीने एका पक्षिणीची व्यथा,  माणसाचा क्रूरपणा आणि आईचे महात्म्य अशा विविध विषयांची अगदी सहज गुंफण केली आहे. ही कविता पृथ्वी वृत्तात लिहिलेली आहे.

( चाल: बालक-पालक चित्रपटात घेतलेल्या मोरोपंतांच्या ‘सुसंगती सदा घडो‘ या कवितेसारखीच. फक्त शेवटच्या कडव्याला चाल जरा मंद होते कारण त्यातील प्रसंगच तसा आहे. )

केवढे हे क्रौर्य!

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

– ना.वा.टिळक

आवडली तर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *